आषाढी वारी निमित्त निघालेल्या वारकरी सांप्रदायाचे दिंडीतील वारकरी भक्तांना देहू -आळंदी येथे पोलीसानीं अमानुष लाठीमार केला. त्याच्या निषेधार्थ व संबंधित दोषींवर कारवाई करा या मागणीचे निवेदन सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीण जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना देण्यात आले.
या निवेदनात वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान आहे.राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार केवळ सत्ता आणि प्रसिद्धी यातच धन्यता मानत आहे आणि हिंदुत्वाची भाषा करीत हिंदूवरच हल्ला अत्याचार करीत आहे हे घातक आहे. मिंदे- फसणवीस युती सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून राज्यात पूर्णपणे कायदा व सुव्यवस्थेचा फज्जा उडाला आहे अशा अनेकप्रकारे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. तरी दोषींची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रताप चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, रेवण पुराणिक, अमित भोसले, संताजी भोळे, राकेश मालकोटे, संतोष केंगनाळकर, अतुल भवर, योगीराज पाटील, विठ्ठल कुराडकर, संभाजी कोडगे, गुरुनाथ कोळी, रेखा आडकी, पप्पू शेख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.



















