सोलापूर शहरातील पोलिस दलात शुक्रवारी खळबळजनक घटना घडली यामध्ये सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार यांच्यासह त्यांच्या ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साडेसात लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या घटनेने पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचं चित्र दिसून आलं, दरम्यान एकाच ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक व त्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक झाल्यानंतर आता त्या पोलिस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार कोणाकडे जाणार याची चर्चा आणि उत्सुकता सोलापूर शहरासह पोलीस खात्यात होती. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी लगेच या पोलीस ठाण्याचा प्रभार सदर बजार पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्याकडे देण्याचा आदेश काढला. सदर बजार पोलिस ठाणे अंतर्गत नियुक्ती झाल्यानंतर अश्विनी भोसले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केल्याचं दिसून आलं, सोलापूर शहरातील पोलीस ठाण्याला प्रथमच महिला ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून अश्विनी भोसले यांची नियुक्ती झाली आहे. अश्विनी भोसले यांच्या जागेवर पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांची नियुक्ती पोलीस आयुक्तांनी केली आहे.




















