राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. पवार हे उगीच दौऱ्यावर येत नाहीत, अनेक महत्वाचे कार्यक्रम असल्यानंतरच त्यांचा दौरा असतो,त्यांच्या दौऱ्यात अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळतात, घडतात. पण या दौऱ्यात पक्क समजलं जातंय की, सोलापूरचे माजी महापौर तथा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे हे येत्या 2 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार हे महेश कोठे यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे.
सोलापूर शहरात मागील काही महिन्यामध्ये हजारो नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत, त्यांच्याशी संवाद शरद पवार हे साधणार आहेत.
एक वर्षांपासून महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. शरद पवारांची बऱ्याच वेळा भेट घेतली, एकदा तर मी प्रवेश घेतोय म्हणून गेलेल्या कोठे यांचा प्रवेश थांबविण्यात आला. मात्र त्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणला. तेव्हापासून कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात पहायला मिळतात, प्रत्येक घडामोडीत त्यांचा सहभाग आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महेश कोठे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
महेश कोठे यांनी 2014 विधान सभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडली, शिवसेनेत गेले, विधानसभा लढवली, हरले, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळवून दिले, नंतर भाजपच्या संपर्कात गेले, मात्र संधी मिळाली नाही, 2019 ला शिवसेनेने तिकीट डावलले, अपक्ष लढले, पराभूत झाले, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. शरद पवारांच्या दौऱ्यात त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातो आहे.

















