सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल हे हसतमुख व्यक्तिमत्त्व, आपल्या खुमासदार शैली साठी अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, त्यांचं असं कोणतं भाषण नाही की स्टेजवरील आणि समोर बसलेले न हसले असतील. सध्या ते निवांत आहेत मात्र आपल्या बार्शी मतदारसंघावर त्यांची पूर्ण नजर आहे. बुधवारी सोपल साहेब रेस्ट हाऊस मध्ये पत्रकारांशी निवांतपणे गप्पा मारत होते, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, मानाजी बापू पाटील यांची उपस्थिती होती.
अनेक महिन्यानंतर सोपलसाहेब सोलापूरात आले आणि रेस्ट हाऊस वर थांबले असल्याने काही ठराविक पत्रकार त्यांच्यासोबत बसले होते, अनेक किस्से त्यांनी सांगितले, युती सरकारच्या काळात सीना माढा बोगदा, कशाप्रकारे मंजूर झाला, बार्शीला पाणी कसे मिळाले, सीनेत पाणी कसे येऊ लागले याची मुद्देसूद आणि मजेशीर माहिती दिली.
1995 च्यावेळी त्यांच्यासह जिल्ह्यातील इतर दोन आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी गेले होते या तिघांचे मातोश्रीवर बाळासाहेबांच्या उपस्थितीत औक्षण झाले, मग काही दिवसात त्या दोन आमदारांनी कशी टांग मारली अशी मजेशीर आठवण त्यांनी सांगितली .याच वेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे हे त्याठिकाणी आले, हसापुरे सोपल साहेबांजवळ गेले त्यांना वाकून नमस्कार करू लागले मात्र सोपल साहेबांनी उठून उलट हसापुरे यांनाच नमस्कार केला. तो क्षण एका पत्रकाराने मोबाईल कॅमेऱ्यात टिपलाच. राजकिय गुरु-शिष्याचं प्रेम किती आहे एकमेबद्दल आदर किती आहे याची जाणीव तिथं उपस्थितांना झाली.
सोपल हे शिवसेनेत आहेत, हसापुरे हे काँग्रेस मध्ये आहेत मात्र राजकारणाच्या पलीकडील आदरातिथ्य कायम आहे. ही दोन नेतेमंडळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनेक वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. एका पक्षात काम केले आहे, जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले हसापुरे यांना निराश व्हावे लागले परंतू त्यांच्यासमोर पर्याय नाही. सोपल यांनीही गप्प न बसता आता जो जिल्हाध्यक्ष झालाय ना त्यांच्या वडिलांचे सुरेश मित्र होते हे काय धवलला माहिती नाही काय?तो आदर सन्मान त्याला द्यावा लागेल.
यावेळी डीसीसी बँक निवडणुकीची चर्चा झाली, जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा झाली, राज्यातील महाविकास आघाडी सरकार बद्दल चर्चा झाली. राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांनी समन्वयाने काम करावे हे सरकार पाच नक्की टिकेल.जर पुन्हा भाजपची सत्ता राज्यात आली असती तर काँग्रेस राष्ट्रवादी वाल्याना भजन करायला जावे लागले असते,असे मजेदार वक्तव्य सोपल यांनी केले मात्र त्या बोलण्यामागील सत्यता तेवढीच होती, कारण भाजपने परिस्थितीच तशी केली होती.


















