काँग्रेस पक्षाने सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदावर अनपेक्षितपणे माळशिरस तालुक्यातील धवलसिंह मोहिते-पाटील यांना बसवले, धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी ही निवड तेवढी सोपी नव्हती त्याच्या पाठीमागे लातूरचे मंत्री अमित देशमुख यांचे बंधू आमदार धीरज देशमुख यासह महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील कसे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे या प्रकरणात जिल्ह्याचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनाही काही करता आले नाही. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही बदल जिल्ह्यात होणार नाही अशी एक चर्चा होती मात्र माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपल्या सहा वर्षाच्या कारकिर्दीत जिल्हाध्यक्ष पदाला मनावा तितका न्याय दिला नाही, कोणताही कार्यक्रम नाही, मेळावा नाही, आंदोलन नाही, उपोषण नाही, बैठका नाहीत यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड वैतागले त्यामुळे बदलाची मागणी पुढे आली.
जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नावाची चर्चा झाली परंतू सहा महिन्यापूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या धवलसिंह मोहिते-पाटील यांनी या निवडीत बाजी मारली. शेवटी काँग्रेसने मराठा समाजाला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. निवड होऊन आता जवळ जवळ दहा दिवस झाले मात्र धवलसिंह मोहिते यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा अजूनही पदभार स्वीकारला नाही.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा ते कधी काँग्रेस भवनात आले नाहीत. लवकरात लवकर पदभार घेऊन त्यांनी ग्रामीण भागात काम करण्यास सुरुवात करावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धवलसिंह मोहिते-पाटील यांची झालेली निवड पक्षाला कितपत फायदेशीर ठरते याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. धवलसिंह यांना आपल्याच भाऊबंदकी विरोधात टक्कर द्यावी लागणार आहे विशेष करून माळशिरस तालुक्यातून काँग्रेसचे किती झेडपी सदस्य ते निवडून आणतात त्यावरच त्यांच्या नेतृत्वाची कस लागणार आहे.


















