सुशीलकुमार माणिकराव शिंदे
सोलापूर : नावात काय आहे?’ असं शेक्सपीअरनं म्हटलंय. त्याचं हे वाक्य अलीकडं सर्रास वापरलं जात असलं तरी नावात बरंच काही असतं याची प्रचिती वारंवार येत असते. सोलापूर शहरात काँग्रेसच्या एका नगरसेविकेनं राबवलेल्या अनोख्या उपक्रमामुळं आज पुन्हा एकदा याचा अनुभव येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज ४ सप्टेंबर वाढदिवस आहे. या निमित्ताने यशदा युवती फाउंडेशनच्या वतीने सुशीलकुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जात आहे. सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात आला, अशी माहिती नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोस पटेल यांनी दिली.
दरम्यान नगरसेविका फिरदोस पटेल यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी कौतूक केले.
मोफत पेट्रोल मिळविण्या साठी सुशीलकुमार किंवा सुशील हे नाव असणाऱ्या व्यक्तींनी आपले आधारकार्ड सोबत आणले होते. त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक रियाज हुंडेकरी, नगरसेवक फिरदोस पटेल, सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण, सोहेल पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला..




















