दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे सोमवारी अज्ञात कारणावरुन कोयत्याने सपासप वार करुन खून केलेल्या आरोपीस 24 तासाच्या आत ग्रामसुरक्षा यंत्रणा आणि मंद्रुप पोलिसांनी वडापूर हद्दीत अटक केली.
ज्ञानदेव नागणसूरे हे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सायकलवरून गवत घेऊन निघाले. रेवणसिद्ध पुजारी यांच्या वस्तीजवळ येताच पाठीमागून संशयित आरोपी अमोगसिद्ध पुजारी यांनी हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार केले. यामुळे ते सायकलवरून खाली उसाच्या शेतात पडले. तेव्हा आरोपींनी त्यांच्या मानेवर डोक्यात तोंडावर सर्वत्र सपासप कोयत्याने वार केले.
गंभीर जखमा झाल्याने व रक्तस्राव होऊन ज्ञानदेव नागणसूर यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर पुजारी हा घटनास्थळावरून पळून गेला. दत्तात्रय नागणसुरे याने फिर्यादीत दहा वर्षापूर्वी आरोपी पुजारी याने आपल्या पत्नीचे माझ्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला. शिक्षा भोगून जामिनावर आल्यानंतर याच संशयावरून त्याने माझ्या वडिलांचा खून केल्याची फिर्याद दिली होती.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, पीएसआय अमितकुमार करपे, अल्लाबक्ष सय्यद तसेच एएसआय लिगेवान, मुलाणी, हवलदार महिंद्रकर, श्रीकांत बुरजे, व्हनमाने, कोळी, काळे व वाघमारे यांच्या पथकाने कारवाई केली.
ज्ञानदेव नागणसूरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरोल रजेवर आलेला आरोपी आमोगसिद्ध भिमु पुजारी याने धारदार शस्त्राने खून केल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार आरोपीचा कालपासून वाडी वस्ती, आरोपीचे नातेवाईक, एस टी स्टँड येथे कसून शोध घेत होते. मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी आरोपी अंत्रोळी- विंचूर अंतर्गत रस्त्यावर आल्याची माहिती खब-याकडून मिळाली.
लगेच सायंकाळी ४.५० वाजता मंद्रूप पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमित करपे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर १८००२७०३६० चा वापर करून अमोगसिद्ध भिमू पुजारी हा खुनातील आरोपी, आंत्रोळी- विंचूर या गावांमध्ये पायी चालत चालला आहे. सर्व गावकऱ्यांना ही माहिती दिली. तसेच आंत्रोळी गावच्या महिला सरपंच यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सर्व गावकरी रस्त्यावर आले व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे व मंद्रुप पोलिसांच्या प्रयत्नाने खुनातील आरोपी जेरबंद होण्यास मदत झाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन थिटे यांनी सांगितले.


















