सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला विधानपरिषदेच्या निवडणुकीने हुलकावणी दिली. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असताना सोलापुरात मात्र काँग्रेस युवक पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा ऐकण्यास मिळत आहे. ही चर्चा केवळ काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये नाही तर सर्वच पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये काँग्रेस युवक निवडणुकीचा बोलबाला आहे.
ही निवडणूक आगामी महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला अतिशय महत्त्वाची असून युवक पदाधिकाऱ्यांमधून कोणता चेहरा शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष म्हणून पुढे येतोय याची उत्सुकता पक्षामध्ये आहे.
सोलापूर शहर मध्य हा काँग्रेसचा बालेकिल्ला. आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हक्काचा मतदार संघ. त्यामुळे या मतदारसंघात युवक अध्यक्ष कोण याकडेही शहराचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात श्रीकांत वाडेकर, वाहिद विजापूरे, सतीश म्हेत्रे, यासीन शेख, मोहनिष घंटे, आकाश तिपरादी, गणेश गायकवाड, मल्लेश शावणकर हे आठ युवक अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत.
यामध्ये श्रीकांत वाडेकर या चेहऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे, वाडेकर कुटुंबीयांची तिसरी पिढी काँग्रेससाठी काम करतेय. यापूर्वी श्रीकांत वाडेकर यांचे आजोबा स्वर्गीय दत्तात्रय वाडेकर हे 1972 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते, त्यानंतर त्यांचे चिरंजीव रामचंद्र वाडेकर यांनी ही काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आता रामचंद्र वाडेकर यांचे चिरंजीव जितू वाडेकर आणि श्रीकांत वाडेकर या दोघांचे काँग्रेस सोबत घट्ट नाते आहे.
पक्षवाढीसाठी त्यांचा मोठा प्रयत्न असतो, विशेष करून बांधकाम कामगार, विडी कामगार व कष्टकऱ्यांसाठी ते विविध उपक्रम राबवतात, मतदार नोंदणी, लसीकरण, फराळ वाटप कार्यक्रम असे अनेक उपक्रम काँग्रेसच्या माध्यमातून वाडेकर कुटुंबियांनी राबविले आहेत.
शिवराम प्रतिष्ठानची शिवजयंती ही सोलापूर शहरात एक चर्चेचा विषय असते, युवकांची प्रचंड मोठी फौज या प्रतिष्ठान सोबत असल्याने हे प्लस पॉइंट श्रीकांत वाडेकर यांच्यासाठी आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी श्रीकांत यांनी आपली मोर्चेबांधणी केली असून आमदार प्रणिती ताई शिंदे यांची साथ असल्याने निश्चित काँग्रेसची ताकद आणखी वाढवण्याचा मनोदय श्रीकांत वाडेकर याचा आहे. एकूणच या युवक पदाधिकारी निवडणुकीत शहर मध्य या विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदासाठी श्रीकांत वाडेकर याची सर्वत्र चर्चा ऐकण्यास मिळते शेवटी आमदार प्रणिती शिंदे यांचा शब्द अखेरचा असल्याने त्या शब्दाची वाट आता वाडेकर कुटुंबीय पाहत आहे.


















