सोलापूर : काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी चेतन चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा महिला अध्यक्ष शाहीन शेख, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीम पठान, भीमराव बाळगे, मोहोळचे राजेश पवार, जिल्हा प्रवक्ते सातलींग शटगार, मल्लेशी बिडवे यांची उपस्थिती होती.
काँग्रेस पक्षाच्या वतीने 14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान महागाई, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती सह प्रभारी चेतन चव्हाण यांनी दिली. केंद्रातील भाजप सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे, पेट्रोल व डिझेलचे दर शंभरी पार गेले, घरगुती वापरासाठीच्या गॅसने तर हजारी पार केली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शहर व जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते गाव, तालुका व शहर पातळीवर जनतेमध्ये जाऊन काँग्रेस पक्ष महागाई, गॅस दरवाढ, इंधन दरवाढीवर जागृत करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारने विविध करांमध्ये कपात करत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता राज्यातील सरकारने कर कपात करून पेट्रोल डिझेल दर आणखी कमी करावे अशी मागणी करत आहे.या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, जेव्हापासून महाराष्ट्रात सरकार आले तेव्हापासून त्यांची मागणी आहे. केंद्राने एक्साईज ड्युटी जितकी कमी केली त्या प्रमाणात राज्य सरकार कमी करू शकत नाही परंतू हजारो कोटींचा थकीत जीएसटी केंद्राने अद्याप दिला नाही, तो प्रथम त्यांनी द्यावा.

















