सोलापूर : महापालिका निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी महापौर यु एन बेरिया, नलिनी चंदेले हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. एकीकडे इतर पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नेते येत असताना दुसरीकडे मात्र पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस अजूनही कमी झालेली नाही.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेचे संपूर्ण जबाबदारी माजी महापौर महेश कोठे यांच्यावर सोपवली आहे त्यामुळे तर आणखी नाराजी पाहायला मिळते. परंतु, या सर्व नाराजांना बोलून खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी कानपिचक्या सुद्धा दिल्या आहेत. असे असतानाही काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं.
सुधीर खरटमल हे राष्ट्रवादीला सत्तेमध्ये आणण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. आम्ही राष्ट्रवादीत असताना या पक्षातील नेत्यांमध्ये धुसफूस ठीक नाही हे जेव्हा त्यांच्या कानावर गेले तेव्हा तौफिक शेख यांचे समर्थक इरफान शेख यांच्यावर नाराज नेत्यांना एकत्र करण्याची जबाबदारी सोपवली, ठरलेल्या प्रमाणे इरफान शेख यांनी सुधीर खरटमल यांच्या सांगण्यावरून सर्व नेत्यांना एकत्र जेवायला बोलावले या ठिकाणी महेश कोठे, सुधीर खरटमल, यु एन बेरिया, तौफिक शेख, दिलीप कोल्हे, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, किसन जाधव या नेत्यांचा समावेश होता.
यावेळी सर्व नेते एकमेकांना बघून काहीसे चकित झाले मात्र या सर्वांच्या मनातील नाराजी सुधीर खरटमल यांनी चर्चेतून घालवली असल्याचे समजते. यापुढे समन्वयाने एकमेकांशी चर्चा करून पुढील रणनीती आखण्याची नियोजन ठरल्याचे सांगण्यात आले.


















