सोलापूर : “महापालिकेतील आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गोरगरिबांचा दाबला गेलेला आवाज काँग्रेसच बळकट करेल. ५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेची सबसिडी देखील आज बंद झाली. मात्र काँग्रेसने सुरू केलेल्या संजय गांधी निराधार, माता रमाई अशा अनेक योजना आज देखील विनाखंड सुरू आहेत.” महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वस्त्रहरण करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी असा हल्ला चढवला. कॉंग्रेसतर्फे सुरू असलेल्या वॉर्डनिहाय बैठक आणि जनजागरण अभियानात प्रभाग क्रमांक १६ मधील बैठकीत त्या बोलत होत्या.
नगरसेवक नरसिंग कोळी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत कॉंग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, काँग्रेसतर्फे सुरू करण्यात आलेल्या जनजागरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकांचा प्रचंड रोष विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात दिसत आहे. आज सोलापुरातील प्रत्येक रस्ता खोदून ठेवला असून ६ महिने ते वर्षभर प्रशासन त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीये. या गलथान नियोजनामुळे लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला. त्यामुळे यांना येणाऱ्या निवडणुकीत पायउतार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले, आज सोलापूरचे खासदार अदृश्यच आहेत. खासदार दाखवा ५००० मिळवा अशी योजना आता राबवावी लागेल. कोरोना काळात लोकांची सेवा करायची सोडून भाजपचे सर्व आमदार, खासदार लपून राहिले. उलट कोविडच्या कठीण काळात आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा ना करता घरोघरी जाऊन प्रत्येकापर्यंत मदत पोहचवली. अडचणीत उपयोगी न पडणारे हे सत्ताधारी घरी बसण्याच्याच पात्रतेचे आहेत.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसच्या सहसचिवपदी नरसिंग आयलेकर, सॅमसन दिनकर, पॉल जगले, राजू जंगडेकर यांची निवड करून आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांचे निवडीचे पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, माजी नगरसेवक जेम्स जंगम, ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, देविदास गायकवाड, सुमन जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, उपेंद्र ठाकर, पुजाताई नेल्ललवार, कुणाल गायकवाड, आगरीफ जगले, मनोज चलवादी, श्रीनिवास व्हस्केरी, महादेव कोळी, उमेश निलगंटी, यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे आभार राजू निलगंटी यांनी मानले.

















