सोलापूर : जिल्ह्यातील 148 गावांमधील 176 जागांसाठी पोटनिवडणुक लागली, त्यापैकी काही ओबीसी जागांच्या निवडणुका आयोगाने रद्द केल्या. या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणतेही विकास कामे त्या भागात करता येत नाहीत. आचारसंहिता संपल्यावर ही कामे हाती घेता येतात.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला बालकल्याण,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यता तयार झाल्या.
यातच जिल्ह्यातील ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागली. जिल्ह्यातील तब्बल 148 गावांमध्ये निवडणूक असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या गावांमध्ये आचारसंहिता लागू आहे त्या गावच्या सर्व प्रशासकीय मान्यता थांबवल्या. एक तरी कामे मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी प्रचंड धडपड केली होती मात्र ऐनवेळी आचारसंहिता लागल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या निकाल लागले मग आता प्रशासकीय मान्यता कधी मिळणार यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, विविध कॉन्ट्रॅक्टर झेडपीत चकरा मारत असल्याचे चित्र आहे.
मात्र जिल्हा परिषद प्रशासन अद्यापही प्रशासकीय मान्यता द्यायला तयार नाही कारण ज्या गावांमध्ये ओबीसी जागेवर पोटनिवडणूक होती ती निवडणूक रद्द झाली आता त्या जागेवर सर्वसाधारण गटातून निवडणूक होणार असल्याने त्याचे मतदान 19 जानेवारी रोजी आहे त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता शिथिल करण्यात आलेली नाही.