देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा इलेक्शन साठी राजकारण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी हे सर्व मोठे पक्ष एकमेकाच्या विरोधात लढणार आहेत. मात्र आता एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही यूपीच्या राजकारणात प्रवेश केला आहे. जन अधिकार पक्ष तसेच मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदाय कर्मचारी महासंघ अशा तिघांची आघाडी उत्तर प्रदेशात झाली आहे. त्याचे नाव भागीदारी परिवर्तन मोर्चा असे ठेवण्यात आले आहे
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि जन अधिकार पक्षाचे बाबू सिंह कुशवाह (Babu Singh Kushwaha) यांच्यासह मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वामन मेश्राम (Waman Meshram) यांनी शनिवारी ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’ ही नवीन आघाडी स्थापन केली.
शनिवारी पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी नव्या युतीची घोषणा केली आणि ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’ राज्यातील सर्व 403 विधानसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा केली. बाबू सिंह कुशवाह यांना ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’चे निमंत्रक बनवण्यात आले आहे.
ओवैसी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या आघाडीला बहुमत मिळाल्यास राज्यात दोन मुख्यमंत्री केले जातील. त्यानुसार एक मुख्यमंत्री दलित समाजातील आणि दुसरा मागासवर्गीय (OBC) समुदायातील असेल. याशिवाय तीन उपमुख्यमंत्री केले जातील, त्यापैकी एक मुस्लिम समाजातील असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बाबू सिंह कुशवाह म्हणाले की, आमच्या युतीचे दरवाजे बंद नाहीत. इतर पक्षही आमच्यासोबत येऊ शकतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील लढतीमध्ये आता ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’ देखील असणार आहे. त्यामुळे आता सपा आघाडी तिसऱ्या क्रमांकावर जाईल, असा दावाही त्यांनी केला.


















