सोलापूर : विश्वभुषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती उत्सव व विश्वस्त समितीची नियोजन बैठक गुरुवारी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मैदानावर पार पडली या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अजित गायकवाड यांची निवड करण्यात आली, तसेच त्याचबरोबर सरचिटणीस शिवम सोनकांबळे, खजिनदार मदन वडावराव, कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, उपाध्यक्ष शरणू हजारे यांच्या निवडी झाल्या आहेत.
सोलापूर शहरात चार दिवसाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव करण्याचा निर्णय घेण्यात आला. 13 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होईल त्यानंतर 17 एप्रिल रविवार रोजी भीम जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय झाल्याची माहिती राजाभाऊ सरवदे यांनी दिली.
राजा सरवदे म्हणाले, सोलापुरात भीम जयंतीच्या दरम्यान दोन वेळा दंगली झाल्या, अडचणी आल्या, घरभेदी झाले तरीही जयंती मिरवणूक शांततेत आणि उत्साहात निघाली. विशेष म्हणजे 1982 साले हिंदू-मुस्लीम दंगल झाली असतानाही मुस्लिम समाजाने या मिरवणुकीचे मोठ्या स्वरूपात स्वागत केले. हा इतिहास आहे शासनाने दिलेले सर्व नियम पाळून विश्वस्त समितीच्या वतीने ही मिरवणूक काढली जाते यंदाच्या वर्षीही कोणत्याही परिस्थितीत मिरवणूक काढण्याचा निर्णय झाला शेवटी सरकारने मंजुरी दिल्याने आता कोणतीही अडचण येणार नाही.
असे किती मंडळ-महामंडळ आले आणि गेलेत, कोण कुठं पर्यंत टिकले हे सर्वांना माहीत आहे, ज्याला आपली गाडी सांभाळता येत नाही,ज्याला स्वतः च मंडळ सांभाळता येत नाही, समाजात खबरी म्हणून ओळखले जाते त्याबद्दल का बोलायचे. विश्वस्त समितीची मिरवणूक जगाच्या पाठीवर बघितली जाते, आता विश्वस्त समितीत तरुणाला संधी मिळेल, येणाऱ्या काळात विश्वस्त ही समिती तरुणांची म्हणून ओळखली जाईल. आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही, आम्ही एक-एक लाखाच्या सभा घेतल्या आहेत असे सांगून सरवदे यांनी जयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.



















