जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला
जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी जगन्नाथ बनसोडे यांनी एडवोकेट निलेश जोशी यांच्यामार्फत सोलापूर येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करून अंतरिम जामीनाची मागणी केलेली होती.
सदर प्रकरणात अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना खोटेपणाने गुंतवले असल्याचे तसेच सदर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अर्नेश कुमार या प्रकरणात दिलेल्या तत्त्वांचा पोलिसांकडून भंग होणार असल्याचे तसेच सदर प्रकरणात चोरी झाल्याबाबत कोणतीही कागदपत्रे व वस्तूंची शहानिशा न करता घाईगडबडीने दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
अतिक्रमण कारवाईदरम्यान जगन्नाथ बनसोडे यांचे अनेक लोकांची वाद निर्माण झाल्याने त्यांना खोट्या गुन्हा अडकवल्याचे षडयंत्र आहे. महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची चोरी बाबत कोणतीही शहानिशा झालेली नाही.
तथाकथित चोरी झालेल्या वस्तू या जागेवरच असल्यामुळे नक्कीच चोरी झाली का? का कायदेशीर मार्गाने वस्तू घेऊन जाण्यात येत होत्या याबाबत चौकशी न करता चोरी झाले असा खोटा आरोप करण्यात आलेला आहे.
सदरचा युक्तिवाद ऐकून सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी अंतरिम जामिनाच्या अर्जावर आदेशासाठी उद्याची तारीख नेमलेली आहे. जगन्नाथ बनसोडे यांच्या वतीने एडवोकेट निलेश जोशी हे काम पाहत आहेत.















