सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते सकाळी ११ ते दुपारी तीन दरम्यान त्यांनी नियोजन भवनामध्ये सर्व विभागांचा आढावा बैठक घेतली त्यानंतर दुपारी तीन ते चार या वेळेत शासकीय विश्रामगृहात नागरिकांची निवेदन स्वीकारणार होते.
मात्र शासकीय विश्रामगृहात कोणतेच नियोजन नव्हते, ते एका बंद खोलीत बसले बाहेर नागरिक, इतर नेतेमंडळी यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस प्रशासन नागरिकांना भेटू देत नव्हते. असे काहीसे चित्र शासकीय विश्रामगृहात होते. याच वेळी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, किसन जाधव, रियाज खरादी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, प्रहार संघटनेचे शहर संघटक जमीर शेख यांच्यासह शेकडो नागरिक थांबून होते.
हा गडबड गोंधळ पाहून आनंद चंदनशिवे म्हणाले, निवेदन घेण्याची ही कसली पद्धत पालकमंत्री विखे पाटलांची, भरणे मामा चांगले होते, सर्वसामान्य सर्वच लोकांची ते थांबून निवेदन घेत होते, त्यावर लगेच प्रशासनाला सूचना करत होते.
दरम्यान पालकमंत्री पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर पडले, नागरिक त्यांच्या मागे ओरडत होते, अशातच काही ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना थांबवले आणि निवेदन दिले तेव्हा बऱ्याच जणांनी थांबवून आपली निवेदने दिली.



















