सोलापूर : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी सोलापूर शहर जिल्ह्याचा दौरा केला.
त्यामुळे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी शेकडो नागरिकांची शासकीय विश्रामगृहावर गर्दी झाली होती. अशा गर्दीत ही पालकमंत्र्यांनी जसा वेळ मिळेल तसे सर्वांची निवेदन स्वीकारली, निवेदन स्वीकारताना काहींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
शासकीय विश्रामगृहावर नागरिकांची निवेदन घेतल्यानंतर दुपारी साडेचार च्या सुमारास त्यांनी नियोजन भवन मध्ये पत्रकार परिषद घेतली. दिवसभरात घेतलेल्या बैठका, कामांचा आढावा याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत देताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा प्रशासनाच्या एकूणच कामाचे त्यांनी नकळत कौतुक केले.
ते म्हणाले, आज दिवसभरात मला शेकडो निवेदने प्राप्त झाली आहेत मात्र सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी बाबत आमचे क्षेत्र राहिले, पंचनामा झाला नाही, नुकसान भरपाई देण्याप्रकरणी एकही निवेदन आलं नाही हे विशेष असल्याचा उल्लेख करताना जिल्हा प्रशासनाने या विषयात चांगले काम केले आहे.
अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत देण्यात सरकार यशस्वी होत आहे, राज्यामध्ये साधारण 4000 कोटीची अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.



















