सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी एकाच विभागात 5 वर्ष टेबलावर ठाण मांडून बसलेल्या 20 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. हे झाले केवळ माध्यमांनी आवाज उठविल्यानंतरच.
बांधकाम क्रमांक दोन या विभागातील लिपिक अनिल राठोड व प्रकाश माने यांच्या बदल्या झाल्या. ते दोघे तिथून रिलिव्ह झाले. त्यापैकी अनिल राठोड हे आरोग्य विभागात रुजू झाले आहेत. त्यातील प्रकाश माने यांची बदली महिला व बालकल्याण विभागात झाली असून महिला व बालकल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक गणेश साळुंखे यांच्या जागेवर प्रकाश माने यांची नियुक्ती झाली असून साळुंखे यांची बदली सामान्य प्रशासन विभागात करण्यात आली.
महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी मात्र प्रकाश माने यांना रुजू करून घेतले नसल्याचे समजते. साळुंखेबाबत आपण मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याशी चर्चा करू असे शेख यांनी माने यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
साळुंखे यांना न सोडण्यात जावेद शेख यांचा इंटरेस्ट काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे प्रकाश माने हे बांधकाम मधून रिलिव्ह झालेत त्यांना रुजू करून घेतले जात नसल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.


















