सोलापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. सोलापुरातील भीमसैनिकानी राज्यपाल कोश्यारी, नामदार चंद्रकांत पाटील, सुधांशू त्रिवेदी आणि प्रसाद लाड यांची तिरडी यात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही अंतयात्रा निघाली. मॅकेनिकी चौकात आल्यानंतर पोलिसांनी तिरडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भीमसैनिकांनी तिरडीला जोडेमार आंदोलन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन समाप्त करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह महापुरुषांची बदनामी करण्याचा डाव मनुवादी भाजपाने आखला आहे. त्यांच्यावर जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देत चंद्रकांत पाटलांचा जो कुणी भांग विस्कटेल त्याला दोन लाख रुपये बक्षीस देऊ असे आवाहन कांत उघडे यांनी केले.
या आंदोलनात कांत उघडे, अतिष बनसोडे, सोहन लोंढे, रत्नदीप भोसले, शांतीसागर सरवदे, आनंद भालेराव, मंटी बाबरे, संदीप सुरवसे, यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















