सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर रतिकांत पाटील यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली आहे. या युवा नेत्याला पक्षाने मोठ्या पदावर संधी दिल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातून आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.
अमर पाटील हे माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या चिरंजीव आहेत. जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. सोलापूर बाजार समितीच्या संचालक पदावर ते काम करतात. दक्षिण तालुक्यात त्यांचे मोठे नेटवर्क असल्याने आगामी विधानसभासाठी दक्षिण मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
शनिवारी निवड होताच त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा स्मारक, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.
‘सिंहासन’शी बोलताना ते म्हणाले, जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लागल्याने माझी जबाबदारी आणखीन वाढली आहे. ‘गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक व शिवसेना आपल्या दारी’ हे अभियान अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात आपण राबवणार आहोत. नवा शिवसैनिक निर्माण करून पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न राहील असे सांगत विधानसभा निवडणूक कधी ही लागो आपण दक्षिणमधून इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितलं.