सोलापूर : बंजारा समाज प्रबोधन मेळावा आणि संत सेवालाल महाराज 101 मूर्ती वाटप सोहळ्यानिमित्त आई प्रतिष्ठान-सोलापूर आणि बंजारासेवक मूर्ती वाटप जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नेहरू नगर येथे शनिवारी समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या करीता भव्य बंजारा लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला महंत जितेंद्र महाराज पोहरागड, महंत जुगनू महाराज विजापूर, आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शुभेच्छा संदेश घेऊन आलेले कानपूरचे आमदार सुरेंद्र मैथानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा. अध्यक्ष गुजरात बोर्ड ऑफ आयुर्वेदिक सिस्टीम मेडिसिन डॉक्टर हसमुख भाई सोनी, आमदार विजयपूर कर्नाटक देवानंद चव्हाण, माजी आमदार प्रकाश यलगुलवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट कार्यवाही विश्वस्त ओमल राजे भोसले, काँग्रेस नेते चेतन नरोटे, अमोल शिंदे, विनोद भोसले, बंटी चंदनशिवे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या सोहळ्याला आपल्या व्हिडिओद्वारे शुभेच्छा पाठवल्या.
तर आमदार विश्वजित कदम यांनी आई प्रतिष्ठानच्या कार्यांचे कौतुक करत बंजारा समाजाच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
सदरहू स्पर्धेमध्ये खालील स्पर्धक संघांनी सहभाग नोंदवला.
१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेहरूनगर, २) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बसवेश्वर नगर( मोठा गट ), ३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बसवेश्वर नगर (लहानगट), ४) अमोल राठोड ग्रुप, देगाव तांडा , ५) जय सेवालाल प्रतिष्ठान, नेहरूनगर, ६) बंजारा डान्स ग्रुप, मोहोळकर तांडा,बोरामणी, ७) जय सेवालाल बंजारा डान्स ग्रुप, आळंद, जि.गुलबर्गा, ८) बंजारा डान्स ग्रुप, सेवालाल नगर, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर ९) बंजारा सोसायटी डान्स ग्रुप.
सर्व संघांनी पारंपारिक वाद्यवृंदांचा वापर करत विविध बंजारा लोकनृत्ये सादर केली आणि उपस्थित मने जिंकली. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.११,१११ रोख, जय सेवालाल बंजारा डान्स ग्रुप आळंद, जिल्हा गुलबर्गा यांना फुलाबाई नामदेवराव राठोड यांच्या हस्ते, तर द्वितीय पारितोषिक रू.७,१११ रोख माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या हस्ते, बंजारा डान्स ग्रुप-मोहोळकर तांडा,बोरामणी या संघाला आणि तृतीय पारितोषिक रू.५१११रोख विमल गणेश पवार यांच्या हस्ते बंजारा सोसायटी डान्स ग्रुप, सोलापूर यांना देण्यात आले.
उर्वरित सर्व सहभागी संघांना रू.११११ रोखचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महादेव ठोंबरे, अश्विनी जाधव आणि शिल्पा दीक्षित-कुलकर्णी यांनी पंच म्हणून काम पाहिले. आई प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश राठोड यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते.





















