सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी येथील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोट प्रकरणात बार्शीचे तहसीलदार यांना जबाबदार धरून सेवेतून बडतर्फ करा, मृतांच्या वारसांना 20 लाख रुपये शासकीय मदत घ्यावी, वारसांना शासकीय नोकरीत घ्यावे या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने मागील तीन दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भेट दिली. त्यांच्याशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.
यावेळी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. बाहेर अपघातामध्ये मरण पावलेल्याना तातडीची मदत दिली जाते पण गोरगरीब, दलित मजुरांकडे दुर्लक्ष केले जात आहे, जिल्हा प्रशासन निगरगट्ट आहे, गरिबांचे संसार उध्वस्त झाले असतानाही कोणतीही आर्थिक मदत नाही, लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला रस्त्यावरील संघर्षाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा म्हेत्रे यांनी दिला.




















