सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सर्व उपअभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता यांचा आढावा कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेलकांदे यांनी गुरुवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेतला.
सदर सभेमध्ये त्यांनी जलजीवन मिशन योजना, टंचाई आराखडा, स्थानिक निधी लेखा परिच्छेद, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन, नळ कनेक्शन जोडणी, नमामि चंद्रभागा अभियान, जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन, अटल भूजल स्त्रोत बळकटीकरण, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना चालू/बंद, अंगणवाडी व शाळा नळ जोडणी कनेक्शन, पाणी आरक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा आस्थापना तब्बल अशा 19 विषयावर सविस्तर आढावा झाला.
कटकधोंड यांनी जलजीवन मिशनची सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना करत कामाची गुणवत्ता चेक झाली पाहिजे अन्यथा कारवाईचा बडगा उगारेन अशी तंबी दिली.
शेलकांदे यांनी स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेताना सर्व यंत्रणा जलजीवन मिशनकडे वळाली आहे, आता स्वच्छ भारत कडे लक्ष देऊन काम करा अन्यथा कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा इशारा दिला.





















