सोलापूर : कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर होत असलेली शिवजयंती, अतिशय जल्लोषी, उत्साही आणि भक्तिभावाने सोलापूर जिल्ह्यात साजरी करण्यात आली. यंदा शिवजयंतीचा उत्साह काही औरच होता.
शिवजयंतीसाठी आज अवघे सोलापूर शहर सजले होते. शिवभक्त सहकुटुंब मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ पुतळ्यास अभिवादनासाठी दिवसभर आणि मध्यरात्री पर्यंत अलोट गर्दी झाली होती. या ठिकाणी शिवप्रेमींनी सहकुटुंब येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. अभूतपूर्व असा उत्साह यावेळी पाहायला मिळाला. येथे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळांचा सत्कार करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता या मिरवणुकीची सांगता झाली.
शहरात रविवारी शिवजयंतीचा उत्साह व जल्लोष विशेष पाहण्यासारखा होता. शिवप्रेमी मोठया संख्येने सहकुटुंब मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. एका मंडळाच्या मिरवणुकीत घोड्यावरील बाल शिवाजींसह मावळ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतले. शिवकालीन मर्दानी खेळांचे चित्तथरारक दर्शन घडले.
भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता दुतर्फा गर्दीने ओसंडून वाहत होता. जनसागराला जणू भरती आल्याचे विलोभनीय चित्र पाहायला मिळाले. चार हुतात्मा पुतळा चौकात तर रस्त्याच्या एका बाजूला पारंपारिक वाद्यांसह लेझीम पथके तर दुसऱ्या बाजूला डॉल्बीचा दणदणाट त्याचबरोबर लेझर शो, स्क्रीन व विद्युत रोषणाईच्या प्रकाश झोतात अवघा परिसर झगमगून गेला. डोळ्याचे पारणे फेडणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळाले.
हिंदू रक्षक मित्र मंडळाच्या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत घोड्यावरील बाल शिवाजींसह मावळ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतले. शिवकालीन संस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीत घडविले.
शिवजयंतीच्या मिरवणुका आणि मर्दानी खेळांचं एक अतूट नातं आहे. आजच्या भव्य मिरवणुकीत याचे दर्शन घडले. देशमुख पाटील वस्ती येथील हिंदू राष्ट्र रक्षक शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तलवारबाजी, दांडपट्ट्यांची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. बाल शिवाजींसह मावळ्यांचा सजीव देखावा लक्षवेधी ठरला.
धर्मवीर संभाजी तालीम संघाच्या मिरवणुकीत लेझीमचे बहारदार खेळ सादर करण्यात आले. डोक्यावर फेटे, भगव्या टोप्या आणि नऊवारी साडी असा शिवजयंती मिरवणुकीत पारंपरिक थाट होता. या मिरवणुकीत तरुणी व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. हे विशेष ! लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली.




















