सोलापूर : होटगी येथील बिर्ला सिमेंट फॅक्टरी कंपनी जवळ एका तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दिनांक 9 रोजी दुपारच्या सुमारास घडली.मयत तरुण एका सिमेंट कंपनीमध्ये कामास असल्याचे वृत्त आहे.
श्रीपती गंगाधर काटगावकर वय ३२, रा. पटने नगर, होटगी स्टेशनजवळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्या तरुणाची खिशातील आधारकार्डावरुन ओळख पटण्यास मदत झाली. दोन दिवसापूर्वी शुक्रवारी दुपारी उद्यान एक्स्प्रेसच्या चालकाने एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती कळवली. घटना कळताच लोहमार्ग पोलीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तिथे गेल्यानंतर मृत तरुणाची पोलिसांनी ओळख पटविली. दरम्यान, त्याच्या खिशामध्ये आधारकार्ड आढळले. त्यावरून पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधला. दरम्यान, तो तरुण एका सिमेंट कंपनीमध्ये कामास असल्याचे लक्षात आले. तो तरुण विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे.


















