सोलापूर : सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावर अमानुषपणे केलेल्या लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्हापर प्रत्येक तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग रविवारी दिनांक ३ सप्टेंबर सकाळी अकरा ते बारा एक तास बंद करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात मराठा समाजातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आंदोलनकर त्यांचे लक्ष्य दिसून आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला.
सोलापूर शहरातील बाळे येथील पुणे सोलापूर महामार्ग अडवून सकाळी साडेदहा वाजता आंदोलन सुरू करण्यात आले. या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान याच वेळेस एक ॲम्बुलन्स सोलापूरकडे आली होती तेव्हा आंदोलकर्त्यानी रस्त्यावरून बाजूला सरकून या अंबुलन्सला रस्ता करून देत माणुसकीचे दर्शन घडवले.
“एक मराठा लाख मराठा” “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं” देवेंद्र फडणवीस यांचा निषेध असो” अशा विविध घोषणा देऊन मराठा समाजाच्या बांधवांनी आपला संताप व्यक्त केला.
आम्ही आज एक तास रस्ता रोको आंदोलन केले आहे. आम्हाला बेमुदत आंदोलन करण्यास भाग पाडू नका, सरकारला आमची विनंती आहे, विशेष अधिवेशन बोलवून ठराव करा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुमचे अस्तित्व महाराष्ट्रातून मराठा समाज संपवून टाकेल असा इशारा देण्यात आला.
सोलापुरातील मराठा समाजातील मान्यवर, महिला भगिनी बालक वृद्ध मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला विविध पक्ष संस्था संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.