सोलापूर : आपल्यासारखीच दिवाळी समाजातील वंचितांनीही साजरी करावी या हेतूने गुरुवारी जणू सामाजिक जाणीवेचे हजारो दीप उजळले. केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनीतर्फे १८ संस्थांतील २ हजार वंचितांना फराळ वाटप करण्यात आले.
जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील बी. सी. बॉईज हॉस्टेल येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. वैशाली कडूकर, शारदादेवी आसावा, उद्योगवर्धिनीच्या प्रमुख चंद्रिका चौहान उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते १८ सामाजिक संस्थांकडे तब्बल २ हजार जणांचा दिवाळी फराळ सुपूर्द करण्यात आला.
स्वआधार संस्था, बी. सी. गर्ल्स हॉस्टेल, कतारी वस्ती, प्रार्थना फाउंडेशन, रॉबिन हूड आर्मी, हबीबा संस्था, आई संस्था, ब्रिजधाम वृद्धाश्रम, बी. सी. बॉईज हॉस्टेल, आधार संस्था आदी १८ संस्थांमधील वंचित मुले, अनाथ मुले, आधार नसलेले ज्येष्ठ नागरिक, भटके लोक अशा एक हजार गरजूंना दिवाळी फराळ देण्यात आला.
बुंदी, लाडू, चकली, करंजी, अनारसे, शेव, चिवडा, शंकरपाळी अशा आठ प्रकारचे जिन्नस असलेला फराळ या गरजूंना देण्यात आला.
प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा म्हणाल्या, समाजातील सर्व घटकातील लोकांनी दिवाळी साजरी करावी या हेतूने फराळ वाटपाचा केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. सामाजिक जाणीव ठेवून काम केल्याने उपेक्षितांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे समाधान आपल्याला मिळते. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. वैशाली कडुकर, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास रेडक्रॉस सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव जयेश पटेल, नंदकुमार आसावा, केतन वोरा, मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केतन वोरा मित्र परिवार आणि उद्योगवर्धिनीकडून गेल्या तीन वर्षांपासून वंचितांना फराळ देण्याचा उपक्रम सुरू आहे. यंदा हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. या उपक्रमाव्यतिरिक्त दत्तक घेतलेल्या १७ विद्यार्थिनींचा शैक्षणिक तसेच घरगुती खर्च, गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देणे, वैद्यकीय मदत, शेकडो वंचितांना भोजन देणे असे उपक्रम वर्षभर राबविले जातात, असे केतन वोरा यांनी याप्रसंगी सांगितले.