सोलापूर : दोन वेळा रद्द झालेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अखेर सोलापूर दौरा निश्चित झाला आहे. गुरुवार २५ मे रोजी ते सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेल्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे (महसूल भवन) लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मसुरी येथे प्रशिक्षणाला असलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सुट्टी घेऊन उद्घाटन समारंभाला आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दुपारी साडे बारा वाजता महसूल भवनाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते तर राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, निवास उपजिल्हाधिकारी, नागरिकांसाठी कक्ष, व्हीआयपी कक्ष, राजशिष्टाचार, नैसर्गिक आपत्ती, महसूल, गृह, आस्थापना, लेखा विभाग, अंतर्गत लेखा विभाग, सामान्य प्रशासन, कुळ कायदा, गौण खनिज, ग्रामपंचायत, पुनर्वसन, नगर विकास शाखा नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होतील तर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी, निवडणुक, जिल्हा व शहर पुरवठा, भूसंपादन क्रमांक १,३,७,११ ही कार्यालये असणार आहेत.



















