सोलापूर : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री दि.१९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२४ दरम्यान सोलापूर येथील वोरोनाका प्रशाला येथील मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
हे पण वाचा : सोलापुरात मोठी राजकीय घडामोड होणार
सदर मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी खा.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खा.रणजितसिंह नाईक- निंबाळकर, खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर, आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आ.अरुण लाड, आ.जयंत आसगावकर, आ.सुभाष देशमुख,आ.बबनराव शिंदे, आ.विजय देशमुख, आ.प्रणिती शिंदे, आ.शहाजी पाटील,आ.राजेंद्र राऊत, आ.संजय मामा शिंदे, आ.यशवंत माने, आ.समाधान आवताडे, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.राम सातपुते तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, उमेद अभियानाचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त संचालक परमेश्र्वर राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हे पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोलापूरकडून मिळणार ही भेट
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे म्हणाल्या की, या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवामध्ये पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातून ६० स्टॉल लावण्यात येणार आहेत.महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करणे तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते, या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होत असतो.या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू , भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू , लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू , कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी इ.वस्तू यांचा समावेश आहे.या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात.शिवाय, घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील.हे स्टॉल अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतील.
हे पण वाचा : सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का
ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरे करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. तसेच दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प.संदीप महाराज मोहिते यांचे प्रबोधनपर जुगलबंदी भारुड व दि.२० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी यांचे प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.दि.२१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सदर मिनी सरस व रुक्मिणी महोत्सव चा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम दि.२१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ठेवण्यात आला आहे.
हे पण वाचा : सोलापुरात लिंगायत समाज का नाराज झाला
या प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ यांची चव शहरी भागातील नागरिकांना चाखण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पांढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील.याशिवाय ग्रामीण महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव या प्रदर्शनातून मिळणार आहे. तरी नागरीकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी व ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा,असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी केले आहे.