फाटक्या साडीत उमेदवारी अर्ज भरायला आलेल्या श्रीदेवी फुलारे सोने घालून फॉर्म काढायला ; या नेत्यांनी केली मध्यस्थी
सोलापूर : सोलापूरचा विकास फाटला असल्याचे सांगत गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती.
श्रीदेवी फुलारे काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते परंतु सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी सव्वादोन च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी आपली माघार घेतली. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला त्या फाटकी साडी घालून आल्या होत्या पण उमेदवारी अर्ज काढायला मात्र त्यांनी अंगावर भरपूर सोनं घालून आल्याचे पाहायला मिळाले.
उमेदवारी अर्ज काढते वेळेस त्यांचे पती जॉन फुलारे हे आवर्जून उपस्थित होते. मीडियासमोर श्रीदेवी फुलारे यांनी जास्त काय बोलू नये याची पुरेपूर काळजी फुलारे यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मध्ये माजी आमदार दिलीप माने यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी जॉन फुलारे यांचे माने यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले. फुलारे यांनी उघड उघड माने यांचे काम केले होते. दरम्यान आता दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने श्रीदेवी फुलारे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात दिलीप माने यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे ऐकण्यास मिळाले.