सोलापूर झेडपीचे फार्मासिस्ट प्रवीण सोलंकी अडचणीत ; भिमशक्ती संघटनेचे गंभीर आरोप
सोलापूर : औषध घोटाळ्यातील प्रविण सोळंकी यांची औषध भांडार प्रमुख पदावरून हकालपट्टी करा, शासनाचे होणारे नुकसान थांबवा, अशी तक्रारी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडे भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या शहर कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी यांनी केली आहे.
प्रविण सोळंकी यांनी यापूर्वी औषध भांडार येथे कार्यरत असताना औषधे जाळली आहेत. 2018 साली आषाढी वारीत औषध खरेदीमध्ये नियमबाह्य पध्दतीने औषधे खरेदी करून घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे व तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे 1 कोटींची वसुली लागली आहे. सोळंकी हे मर्जीतील औषध कंपन्या व नातलगांच्या औषध कंपन्यांना नियमबाह्य पध्दतीने ऑर्डर देतात.
औषधांची ऑर्डर दिलेल्या अनेक कंपन्यांकडून एक्सपायरी डेट जवळ आलेली औषधे खरेदी करतात. आणि बिले मात्र टेंडर दिलेल्या वर्कऑर्डर प्रमाणे काढतात. उर्वरित मार्जीन/टक्केवारी ते घेतात. नविन व इतर कंपन्यांना ते टेंडर न भरण्यास ते सांगतात. औषधांच्या खोट्या नोंदी स्टॉकबुकला घेतात. तसेच एका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बंधू सोबत औषध कंपनीमध्ये भागीदारही आहेत. कोटेशनवर बोगस खरेदी करतात. त्यामुळे अशा अनेक गैरमार्गाने कार्यरत असलेल्या व शासनाची लुबाडणुक करणाऱ्या प्रविण सोळंकी यांना हटवून त्यांना त्यांच्या मुळ ठिकाणी पाठवावे. तसेच त्यांना लवकरात लवकर न हटवल्यास लोकशाही मार्गाने बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या शहर कार्याध्यक्षा रत्नमाला परदेशी यांनी दिला आहे