सोलापूर पोलिसांची ‘लय भारी’ कामगिरी ; सायबर गुन्ह्यातील दोघांना गुजरात मधून अटक
सोलापूर : सिमकार्डचा क्रमांक सांगून ते तुमच्या नावावर आहे, त्यावरुन व्हॉटसअॅपव्दारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झालेले आहेत. त्याबाबत दाखल गुन्ह्यात तुम्हाला आमचेकडून Digital Arrest करण्यात आलेली आहे. असं सांगून फसविणाऱ्या टोळीतील दोघांना शहर पोलिसांनी गुजरातेतून अटक केली. धवलभाई विपुलभाई शाह (वय- ३९ वर्षे) आणि हार्दिक रोहितभाई शाह (वय ४३ वर्षे, दोघे रा. अहमदाबाद शहर) अशी आरोपींची नांवं असून उर्वरित ३ आरोपी हे सध्या दुबई येथे परागंदा झाले असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथील तक्रारदार यांना ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉटसअॅपव्दारे ऑडीओ व व्हीडीओ कॉल करुन, त्यांनी स्वतःला आयपीएस अधिकारी व सीबीआय अधिकारी बोलतो आहे, असे सांगुन, तक्रारदार यांना प्रथम त्यांचे नावाचे एक सिमकार्ड क्रमांक सांगून, ते तुमच्या नावावर आहे, त्यावरुन व्हॉटसअॅपव्दारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झालेले आहेत. त्याबाबत कुलाबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला आमचेकडुन Digital Arrest करण्यात आली आहे.
याबाबत कोणाशी काही एक चर्चा करावयाची नाही, कोणाला काही सांगायचे नाही, अशी भिती घातली. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना अरेस्ट वॉरट, सुप्रिम कोर्टाची नोटीस सर्व्हेलन्सचे ३ पानी इंग्रजी मध्ये नियम असलेली नोटीस व्हॉटसअॅपवर पाठवून ती वाचण्यास लावून त्याचा अर्थ त्यांनी तक्रारदार यांना सांगितला.
तसेच तक्रारदार यांना तुम्हाला कोठेही बाहेर जाता येत नाही, बाहेर जायचे असल्यास आम्हाला विचारा, तुमचा कॅमेरा सतत चालू पाहिजे, तुम्ही कॅमेरे समोर पाहिजे असे सांगून तक्रारदार यांना मोबाईलवर वॉटसअॅप व्हीडीओ कॉल सतत चालू ठेवण्यास सांगितले.
त्यावरुन वेगवेगळे लोकांनी स्वतःला मोठे पदाचे अधिकारी आहोत, असे सांगून, बोलू लागले. त्यावेळी फसवणूकदार स्वतःचा चेहरा दाखवित नव्हते. त्यानंतर समोरील अनोळखी IPS पोलीस अधिकारी विजय खन्ना यांनी, कोण-कोणत्या बँकेत खाते आहे?, एफ डी किती आहे?, म्युचवल फंड शेअर्स आहेत का? याची माहिती घेतली व तक्रारदारास तुमच्याजवळ कोणीही नसेल, अशा ठिकाणी एका खोलीत बसण्यास सांगून बनावट सीबीआय चे राहुल गुप्ता यांनी तक्रारदार ‘आता कोर्टासमोर तुमच्या वतीने म्हणणे मांडतो, मग तुम्ही कोर्टाशी बोला, कोर्ट काय निर्णय घेईल, त्यास तुम्ही जबाबदार असाल’ असे सांगितले.
थोड्या वेळाने कोर्ट म्हणून एका अनोळखी व्यक्तीने, कॅनरा बँकेतील तुमच्या नावावरील खात्यामधून रक्कम ट्रान्सफर मनी लॉर्डरीग मध्ये झालेली आहे, त्याचे पुरावे आमचे समोर आहेत, त्यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे, असे बोलल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांना माझा त्या प्रकरणाशी काहीएक संबंध नाही, असे म्हणाले असता कोर्टाने मला, हे मान्य नाही, तुमचेकडे कोणताही पुरावा नाही, त्यामूळे तपासकामी सदरचे कोर्ट सद्या Adjourned (स्थगिती) करीत आहोत असे म्हणून ३ वेळा टेबलवर कशानेतरी मारल्याचा आवाज काढला.
त्यानंतर सीबीआय चे राहुल गुप्ता यांनी तक्रारदार यांना उद्देशून, तुम्हाला कोर्टाचा डिसीजन कळवू, तुम्ही बसून रहा, असे सांगितले. त्यानंतर फसवणुकदाराने कोर्टाचे एकूण ५ पानाचे निर्णय असलेला इंग्रजीतील मजकूर असलेली ऑर्डर तक्रारदार यांचे वाटॅसॅपवर पाठवली.
ती त्यांना पूर्ण वाचण्यास लावून आरबीआय चे गाईडलाईन प्रमाणे तपास कामात सहकार्य केले पाहिजे, असं समजावून सांगून एक सिक्रेट खाते असते, त्यावर तुम्ही तुमची रक्कम नोटरी करुन आम्हाला जमा करायचे असते, ते तुम्हाला आमचे तपास पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ४८ तासांत परत मिळतील, असे सांगून, एकूण २७,१०,००० रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यात पाठविण्यास भाग पाडून त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी गतवर्षी ०४ डिसेंबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ०८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्स्पर्ट टिमने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे याद्वारे अहमदाबाद गुजरात येथून आरोपी धवलभाई विपुलभाई शाह (वय- ३९ वर्षे) आणि हार्दिक रोहितभाई शाह (वय ४३ वर्षे, दोघे राहणार अहमदाबाद शहर, राज्य गुजरात) यांना अटक केली. या आरोपीतांकडून पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्या एकूण ०५ साथीदारांना निष्पन्न केले असून, त्यापैकी ०३ आरोपीत हे सध्या दुबई येथे परागंदा झाले आहेत.
या गुन्ह्यात अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व फसवणूक रकमेपैकी ३,१०,००० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. गुन्हा उघडकीस आणलेला आहे. उर्वरीत आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे एका प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्रीमती. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीशैल गजा सोबत पोलीस उप-निरिक्षक नागेश इंगळे, पो.ना./१३४८ कृष्णात जाधव, पो.कॉ./६६५ रतिकांत राजमाने यांनी पार पाडली.
नागरिकांना आवाहन
वरील प्रमाणे सोलापूर शहरातील लोकांना सोशल मिडीयाव्दारे, वॉटसअॅप कॉल, फोन कॉल करुन हिंदी/इंग्रजी भाषेमध्ये बोलून भिती व समाजात बदनामी होईल, अशी भिती दाखवत आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. अशा प्रकारच्या घटनेसंदर्भात कोणास कॉल अथवा सोशल मिडीयावरुन व्हीडीओ कॉल आल्यास त्यांना प्रतिसाद न देता सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालय, तिसरा मजला, सोलापूर शहर किंवा जवळच्य पोलीस ठाणे येथे तक्रार करावा, असं आवाहन सोलापुरातील तमाम नागरिकांना सोलापूर शहर पोलीसांच्या वतीने करण्यात आलं आहे.