“सोलापूरवालों, जरा होशियार यहाँ के हम है ‘M’ ‘ राजकुमार’ ; पोलीस आयुक्तांच्या महत्वाच्या सूचना अन् तंबी
सोलापूर : शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तसेच शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त एम. राजकुमार होते.
या बैठकीचा प्रमुख उद्देशच ही शिवजयंती मिरवणूक डॉल्बीमुक्त असावी असाच होता. त्यासाठी मध्यवर्तीच्या प्रमुख मार्गदर्शकांनी यंदाची शिवजयंती मिरवणूक डॉल्बीमुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, त्यासाठी आम्ही आवाहनही केले आहे. पण काही मंडळ या मिरवणुकीत डॉल्बीसाठी आग्रही आहेत. ज्या मंडळांची डॉल्बीमुक्त मिरवणूक आहे त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग ठेवावा आणि ज्या मंडळांचा डॉल्बी असेल त्यांच्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पण पोलीस आयुक्त राजकुमार यांनी याप्रकरणी डॉल्बीमुक्त मिरवणूक करण्याचा सल्ला दिला.
पोलीस आयुक्त राजकुमार यांनी आपल्या भाषणात केलेल्या सूचनांची सध्या सोलापुरात चर्चा होऊ लागली आहे.
नुकतेच सोलापुरात माता रमाई यांची जयंती मिरवणूक संपन्न झाली. त्या मिरवणुकीत 24 मंडळानी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीबाबत सोलापुरात प्रचंड अशी नाराजी व्यक्त करण्यात आली. या मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज हा अतिशय मोठा असल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान हाच मुद्दा पोलीस आयुक्तांनी आपल्या भाषणात घेतला. तुम्हाला वाटत असेल की, परवा झालेल्या मिरवणुकीत डॉल्बी लावल्या गेल्या, आंबेडकर जयंती सुद्धा तेच होईल परंतु येत्या चार दिवसात त्याचे परिणाम दिसतील. या 24 मंडळाच्या 72 जणांना रेकॉर्डवर घेण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल असा इशारा राजकुमार यांनी दिला.
यंदाची शिवजयंती डॉल्बीमुक्त, डिजिटलमुक्त करावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. ज्या शिवजयंतीच्या मोठ्या मंडळाचा अध्यक्ष असतो त्यांची मुलं मात्र फॉरेनमध्ये एमबीबीएस, इंजिनियरचे शिक्षण घेतात आणि तुम्ही म्हणजे या ठिकाणी डॉल्बीवर नाचून आयुष्य बरबाद करता, हे यापुढे होऊ नये. उत्सव शांततेत साजरे व्हावेत, मोठे डिजिटल बॅनर जो कोणी लावेल त्यांच्यावर ही पोलिसांची नजर राहील असेही राजकुमार म्हणाले.
शिवजन्माच्या पाळणा सोहळ्यासाठी ज्या महिला येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी तुमच्याच मुलांनी घ्यावी, पोलिस बंदोबस्ताची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत सोलापूर शांतताप्रिय राहावे, भयमुक्त असावे यासाठी तुम्हीच प्रयत्न करावेत असेही पोलीस आयुक्त म्हणाले.