सोलापूर भाजपमधून बंडखोरीचा वास ; सोलापूरचा उमेदवार बदला, इच्छुक दिलीप शिंदे यांची श्रेष्ठींकडे मागणी
सोलापूरात भारतीय जनता पार्टीने आ. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा व सोलापूरकरांचा प्रचंड विरोध असून स्थानिक नेतृत्वाने तसेच सोलापूरकरांनी कार्यकर्त्यांनी सोलापूरला स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी वारंवार केली असताना सुद्धा अखेर परकाच उमेदवार दिला. भविष्यात सोलापूर लोकसभा निवडणूकीत विजयी होणारी भाजपाची जागा पराभूत होऊ शकते. म्हणूनच कार्यकर्त्यांच्या व सोलापूरकरांच्या आग्रहास्तव उमेदवार बदलावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दिलीप शिंदे यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन ती माहिती दिली. उमेदवार बदला नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करावी लागणार आहे. यासाठी दि. १ एप्रिल २०२४ रोजी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आर्शिवाद कॉम्प्लेक्स, सात रस्ता, सोलापूर येथे दिलीप शिंदे यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा खासदार असून सोलापूरचा विकास झाला नाही अशी ओरड जनतेतून असताना किमान २०२४ च्या लोकसभेला भारतीय जनता पार्टी स्थानिक उमेदवार देतील असे वाटत होते. परंतु परकाच उमेदवार दिल्याने तमाम सोलापुरकरांची भ्रम निराशा झाली आहे. कुणीतरी मोठे षडयंत्र करीत सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचा बीड येथील रहिवासी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचा मार्ग मोकळा केला असल्याचे बोलले जात आहे.
आपण कधी एकदा स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या उमेवदाराला निवडून आणू, मा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करु असे झाले होते. परंतु सोलापूरकरांच्या या आशेवर अखेर पाणी फिरले.
सोलापुरातील स्थानिक उमेदवार द्यावा या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बाहेरच्या उमेदवाराला विरोध असताना ही भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीतरी मोठे षडयंत्र करून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी परक्या राम सातपुते यांना उमेदवारी दिली. असा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये नुकतेच दाखल झाले होते. विधानसभा निवडणूक लागल्या त्यावेळी राम सातपुतेंना बीडहून माळशिरस विधानसभेसाठी सामावून घ्यावे असा निरोप देण्यात आला. दिलदार मनाने दादांनी त्यांना स्वीकारले व विधानसभेला निवडून आणले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात जवळपास २० लाख मतदार आहेत. यात एकही कार्यकर्ता लोकसभा निवडणुकीसाठी लायक नाही असा मेसेज कोणीतरी जाणीवपूर्वक पेरला गेला आहे. सोलापूरकरांची लायकी नाही म्हणूनच की काय ? बाहेरच्या जिल्ह्यातील राम सातपुते हा लायक असल्याचे आम्हाला सांगितले जात आहे. यानिमि त्ताने सोलापूरकरांची लायकीच काढण्याचा प्रयत्न झाला आहे अपमान करण्यात आला.
सोलापूरात आंबेडकर समाजाचे जवळपास २ ते अडीच लाख निर्णायक मते असताना विचार केला गेला नाही.
२०१४ च्या दुरंगी लढतीत लोकसभा निवडणूकीत शरद बनसोडे समाजाचे असल्याने समाजाची एकगठ्ठा मते त्यांना मिळाले. २०१९ ला तिरंगी लढत झाली. इथे सुशिलकुमार शिंदे, जयसिद्धेश्वर स्वामी व प्रकाश आंबेडकर यांच्या लढतीत आंबेडकर समाजाची १ लाख ७० हजार मते प्रकाश आंबेडकरांना मिळाली. ती विभागली गेली आणि इथे भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी झाले. २०२४ या निवडणूकीत दुरुंगी लढत अपेक्षित आहे. इथे डॉ. आंबेडकरी समाजाची निर्णायक मते ठरणार आहेत. परंतु बाहेर जिल्ह्यातील डॉ. आंबेडकरी समाजाचा उमेदवार नसल्याने ही मते काँग्रेसला जातील अशी शक्यता आहे. तेव्हा पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घ्यावी व उमेदवार बदलावा.
१९ सोलापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी लोकसभेला भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली होती. यातील एकाही उमेदवाराला मुलाखतीला बोलावले नाही, चौकशी केली नाही, आम्हाला सतत सांगण्यात आले की. आपले नाव सर्व्हेतून येऊ द्या. मग राम सातपुते स्थानिक नसताना त्यांचे नाव सव्र्व्हेत कसे आले असा प्रतिसवाल कार्यकर्ते व नागरीक करीत आहेत.