ज्योती वाघमारे यांची गर्जना ; मोची समाजाचा आमदार विधानसभेत गेला पाहिजे ; पक्ष विसरून प्रचार करेन
सोलापूर : शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभास मोची समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जांबुमुनी मोची समाजाकरिता सभामंडप व कंपाऊंड वॉल यासाठी वीस लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्या विकास कामाची भूमिपूजन बुधवार 2 ऑक्टोबर रोजी हुडको सोनी नगर येथील जांबमुनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय हेमगड्डी होते.
कार्यक्रमाला प्रियदर्शन साठे, सरस्वती कासलोलकर, बसवराज म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, रतिकांत कमलापुरे, रवि आसादे, प्रा. नरसिंह आसादे, करेप्पा जंगम, सिद्राम कामाठी, शिवराम जगले, मारेप्पा कंपली, कुमार जंगडेकर, नागनाथ वाघमारे यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागेश म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले.
संजय हेमगड्डी म्हणाले, मोची समाजाच्या विकासासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व एकत्र आलोत हे महत्वाचे आहे. ज्योती वाघमारे यांनी समाजाच्या उन्नतीसाठी निधी आणला तो निश्चित कौतुकास्पद आहे.
अनेक जण नगरसेवक झाले, अनेक पदे भोगली, आता कुणीही कोणत्या पक्षाकडून आमदारकीचे तिकीट आणावे समाज म्हणून पाठीशी उभा राहीन.
देवेंद्र भंडारे म्हणाले, समाजासाठी आनंदाचा दिवस आहे, ज्योती वाघमारे यांनी मोठा निधी दिला, त्याबद्दल कौतुक केले. समाजाचे अनेक प्रश्न आहेत, बाबू जगजीवनराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणे गरज आहे, त्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी वाघमारे यांच्याकडे केली. समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा एक शक्ती तयार होते, त्यामुळे मोची समाजाचा आदर्श घेण्यासारखे आहे. इथे सर्वपक्षीय आहेत पण राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही एकत्र येतो.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, समाज माझ्या पाठीशी असल्याचा मला अभिमान आहे. मी जिथे कुठे उभी राहते त्यावेळी माझा समाज माझ्या पाठीशी आहे हे माझे भाग्य समजते. या समाजात जन्माला आले माझे पुण्य आहे, त्यामुळे माझ्या समाजासाठी देणं लागते म्हणून मी प्रयत्न करतेय, राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आलो ही आनंदाची गोष्ट आहे. समाजाच्या शाळेचा प्रश्न लवकरच सुटेल, आचारसंहिता लागायच्या आत मोची समाजासाठी महामंडळ मंजूर होईल हा शब्द देते.
मला भावी आमदार म्हणतात, अनेक जण इतर पक्षा कडून इच्छुक आहेत. मी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली पण यावेळी काहीही करून मोची समाजाचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे, जो पक्ष उमेदवारी देईल मी पक्ष विसरून प्रचार करेन अशी घोषणा केली.
बसवराज म्हेत्रे यांनी ज्योती वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या त्या प्रवक्त्या झाल्या, त्यांनी समाजाचे नाव उंचावले, समाजासाठी त्यांनी निधी आणला त्याबद्दल कौतुक आणि अभिनंदन केले.
नरसिंह आसादे म्हणाले, समाजात विकासाचा निधी आला पाहिजे यासाठी देवेंद्र भंडारे यांनी प्रयत्न केले, ज्योती वाघमारे यांनी आपल्या भागात एक कोटी 20 लाखाचा विकास निधी दिला त्यांचे विशेष कौतुक करतो. सरकार कडून समाजाला निधी आल्याची पाहिली वेळ असल्याचे सांगितले.
सिद्राम कामाठी यांनी प्रास्ताविक करताना देवेंद्र भंडारे यांच्या कार्याचे कौतुक केले, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी समाजाच्या विकास कामासाठी निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.