शिखर पहारिया यांच्या एन्ट्रीने ‘शहर मध्य’चे काँग्रेस इच्छुक हिरमुसले..! तिरुपतींच्या पोस्टने झाले सिद्ध ! Political news
सोलापूर : सोलापूर शहराच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दक्षिण सोलापूर मतदार संघातून सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या केलेल्या घोषणेमुळे काँग्रेस मधील अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले.
प्रणिती शिंदे यांच्या हक्काच्या आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शहर मध्य या मतदारसंघातून सुद्धा काँग्रेसकडून इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळाली. त्यामध्ये मुस्लिम समाजातील सर्वाधिक नेते इच्छुक आहेत. स्वतः शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह मोची समाजातील संजय हेमगड्डी, देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, मुस्लिम समाजातील आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, जुबेर कुरेशी, फिरदोस पटेल, शकील मौलवी, मैनुद्दीन शेख अशी इच्छूकांची नावे सांगता येतील.
मागील दोन दिवसापासून सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया यांची सोलापुरात एन्ट्री झाली आहे. तसे तर शिखर हे यापूर्वी अनेक वेळा सोलापूरला येऊन गेले आहेत परंतु आता ते सोलापूर शहरांमध्ये फिरत आहेत. त्यांनी गणेश उत्सव मंडळांना भेटी दिल्या यामध्ये विशेष करून मध्य मधील गणेशोत्सव मंडळावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहर मध्य मधून प्रणिती शिंदे यांचा वारसदार म्हणून शिखर पहारीया यांना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. पहारिया यांच्या शहर मध्य मधील एन्ट्रीने काँग्रेस इच्छुक हिरमुसले असल्याचे चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख तिरुपती परकीपंडला यांनी टाकलेल्या पोस्टवरून आता तर निश्चितच शहर मध्यचे संभाव्य उमेदवार म्हणून शिखर पहारीया हे असतील हे सिद्ध होताना दिसत आहे. पहा काय आहे ती पोस्ट.
नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि समाजसेवेचा वारसा जपणारी सुशीलकुमार शिंदे यांची तिसरी पिढी, शिखर पहारीया…..
शिखर दादा… तुमच्या या कार्यात आदरणीय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आशीर्वाद खासदार प्रणिती ताई आणि काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांची साथ असेल. म्हणतात ना, “माशाच्या पिल्लाला कधी पोहायला शिकवायची गरज लागत नाही”! वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असणारे, सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे नेतृत्व, मा. श्री. शिखर दादा पहारिया यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !