सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. राज्याचा अध्यक्ष येत असल्याने सोलापुरात स्वागताची जंगी तयारी करण्यात येत आहे. शहर अध्यक्ष प्रकाश वाले हे मागील आठ दिवसांपासून आपल्या अध्यक्षाचा दौरा यशस्वी करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.
शनिवारी दुपारी काँग्रेस भवनामध्ये एक चित्र पत्रकारांना असं दिसलं की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी स्थायी समिती सभापती मधुकर आठवले हे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेस भवनात पाहायला मिळाले. त्यामुळे पत्रकारांना एकच प्रश्न पडला. नक्की काँग्रेसला ‘आठवले’ मधुकर की, आठवलेंना ‘काँग्रेस’.
विजापूर नाका परिसर म्हटले की,या भागातील सर्वात प्रथम राजकीय नेत्याचे नाव समोर येथे ते म्हणजे मधुकर आठवले यांचेच. 2015 साली आरक्षणाने धोका दिल्याने आठवले यांच्या हातात तोंडाचा आलेला महापौरपदाचा घास गेला. अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण पडले असते तर निश्चित आठवले हे सोलापूर शहराचे महापौर म्हणून दिसले असते मात्र त्यांच्या नशिबात ते नव्हते.
अनेक वेळा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक झालेल्या मधुकर आठवले यांना 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिले नाही, त्यांना डावलण्यात आले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते काँग्रेस पासून चार हात लांब दिसून आले तसे पाहिल्यास मधुकर आठवले हे दिवंगत नेते विष्णुपंत तात्या कोठे यांचे कट्टर समर्थक. त्यांचा वावर कायम ‘राधाश्री’वर दिसून यायचा. त्यामुळे मधल्या काळात ते कॉंग्रेस भवन आणि राधाश्री वर सुद्धा दिसले नाहीत.
कोठे समर्थक म्हणून ओळख असल्याने ते सुद्धा महेश कोठेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जातील अशी राजकिय चर्चा होती. दरबान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मधुकर आठवले हे पुन्हा कॉंग्रेस भवनात दिसल्याने माहिती घेतली असता, मागील अनेक महिन्यांपासून आठवले पक्षामध्ये सक्रिय झाल्याची माहिती मिळाली. शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना घेऊन त्यांनी आपल्या भागात अनेक कार्यक्रम राबवले आहेत या ज्येष्ठ नेत्याच्या सक्रिय पणामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला निश्चितच फायदा होईल अशी चर्चा असली तरी महापालिका निवडणुका अजून सहा महिने पुढे गेल्याने या सहा महिन्यात राजकारणात बरीच समीकरणे बदलतील.