सोलापूरच्या या सोसायटीत आढळला विषारी घोणस ; रहिवाशांचा दिवसभर जीव मुठीत
सोलापूर : अत्यंत विषारी समजला जाणारा घोणस साप जुळे सोलापूर भागातील हेरिटेज पाम्स सोसायटीमध्ये रविवारी आढळून आला. सर्पमित्र रवी स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहिम हाती घेतली. पण घोणस साप आढळून आला नाही यामुळे सोसायटीमध्ये दिवसभर भीतीचे वातावरण होते पण रात्री आठ वाजता पुन्हा एकदा हा विषारी घोणस सोसायटीमधील रहिवाशाच्या निदर्शनाला आला आणि तत्काळ सर्पमित्रांना पुन्हा बोलावून घेतले.
ज्या ठिकाणी घोणस आढळून आलेला होता त्या ठिकाणी जेसीबी मशीन लावून तिथला बांधकामाचा आजोरा बाजूला केला. कित्येक तास परिश्रम केल्यानंतर या विषारी घोणस सापाला पकडण्यात सर्पमित्रांना यश आले. यामुळे हेरिटेज पाम्स सोसायटीमधील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सोसायटीचे चेअरमन सुजीत कोरे यांनी तत्परतेने सतर्कता दाखवून वेळीच सर्पमित्रांना बोलावले. सर्पमित्रांच्या कामगिरीने सोसायटी मधील रहिवाशांनी सुटकेचा नि: श्वास टाकला. चेअरमन आणि सोसायटी मधील रहिवाशांनी सर्पमित्रांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.