‘शहर मध्य’ भाजप कडून पांडुरंग दिड्डी, राम सातपुते, देवेंद्र कोठे यांना सर्वाधिक पसंती ; भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले मतदान
सोलापूर : भारतीय जनता पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या त्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून उमेदवार कोण असावा याची चाचपणी करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी पदाधिकाऱ्यांचे गुप्त मतदान झाले.
बुधवारी शासकीय विश्रामगृहावर भाजपचे निरीक्षक धर्मेंद्र खंडारे यांच्या उपस्थितीत शहर मध्य या मतदारसंघासाठी पदाधिकाऱ्यांची गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शहर मध्ये संयोजक दत्तात्रय गणपा, यांच्यासह ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी यांच्यासह माजी नगरसेवक माजी महापौर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर मध्य मधील माजी नगरसेवक भाजपचे शहर जिल्ह्याचे पदाधिकारी, मंडल विभागाचे पदाधिकारी असे एकूण 115 मतदान होते त्यापैकी सुमारे 90 पदाधिकाऱ्यांनी मतदान केल्याची माहिती मिळाली.
शहर उत्तर मध्ये पद्मशाली समाजाचे सर्वाधिक पदाधिकारी असल्याने त्यांच्यातून माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी काका यांच्यासह माळशिरसचे आमदार राम सातपुते, युवा नेते देवेंद्र कोठे यांना पदाधिकाऱ्यांनी पसंती दिल्याचे सांगण्यात आले. शहर मध्य साठी श्रीनिवास संगा, अंबादास गोरंटला हे सुद्धा इच्छुक असून त्यांनाही काही पदाधिकाऱ्यांनी पसंती दिल्याचे ऐकण्यास मिळाले.
लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीला झालेल्या मतदानामुळे शहर मध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. पांडुरंग दिड्डी हे इच्छुक असून ते पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. या मतदारसंघात पद्मशाली समाजाची मतदार संख्या मोठी असल्याने अशा ज्येष्ठ कार्यकर्त्याला पक्षाने संधी द्यावी अशी ही मागणी होत आहे.