काय राव ! नव्या पालकमंत्र्यांचा पहिलाच दौरा अन् तो ही काँग्रेस नेत्याच्या चित्रपट थिएटरच्या उद्घाटनासाठी
सोलापूर : राज्यात महायुतीची सत्ता आली, सोलापूरने भाजपला तब्बल पाच आमदार दिले. मागच्या पंचवार्षिक मध्ये पाच वर्षात पाच परके पालकमंत्री सोलापूरला मिळाले. त्यामुळे यांना आपल्या हक्काचा पालकमंत्री मिळेल अशी प्रत्येक सोलापूरकरांना आशा होती. पण सगळ्यांच्याच आशेवर पाणी फेरले गेले.
भाजपच्या पाच पैकी एकालाही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे सोलापूरच्या माथी पुन्हा परकाच पालकमंत्री हे निश्चित झाले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री पदी नियुक्ती झाली. युवा मंत्री आणि डॅशिंग राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या निवडीचे स्वागत ही होत आहे.
आता हे नवे पालकमंत्री सोलापूरचा पहिला दौरा कधी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. 25 जानेवारी रोजी पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊन दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होईल असे बोलले जात होते.
पण राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पहिला सोलापूर दौरा मंगळवारी आला. असे वाटले की कोणत्यातरी विकास कामाचे अथवा पंढरपूर किंवा अक्कलकोट दर्शनाचा दौरा असेल पण त्या दौऱ्यात दिसले वेगळेच.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील यांच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे सुमन सिनेप्लेक्स या सिनेमागृहाचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यामुळे हा दौरा पाहताच पालकमंत्र्यांचा पहिलाच दौरा अन् तोही चित्रपट थियटरच्या उद्घाटनासाठी असे म्हणून नवल व्यक्त होत आहे.