जय हो…!! सोलापुरात आता ‘ कुमारां’चाच राहणार बोलबाला
सोलापूर : सोलापूरच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात नवीन योगायोग जुळून आला आहे तो म्हणजे कुमार या नावाचा. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरला अखेर पालकमंत्री मिळाला अपेक्षेप्रमाणे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री होते आणि आगामी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहता चंद्रकांत पाटील हेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशी चर्चाही सुरू होती परंतु चंद्रकांत पाटलांना सांगली जिल्हा देण्यात आला. जयकुमार गोरे यांना पालकमंत्री करण्यामागे अनेक कारणे आहेत.
सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याही नावात कुमार आहे. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या कामाची पद्धत हटके आहे. त्यांनी एखादा विषय मनावर घेतला तर त्याचा शेवट पर्यंत पाठपुरावा करतात. सोलापूरच्या विकासाचे अनेक विषय त्यांनी मनावर घेतले आहेत आता त्यांच्या जोडीला युवा पालकमंत्री मिळाला असल्याने ते विषय लवकरच मार्गी लागतील.
सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याही नावात कुमार आहे. त्यांच्याही कामकाजाची पद्धत वेगळीच आहे. मागील काही महिन्यात आपला वेगळा ठसा त्यांनी सोलापूरकरांवर उमटवला आहे. एम राजकुमार हे सोलापुरात आल्यापासून शहरातील शांतता अबाधित राखल्याचे पाहायला मिळत आहे. दोन समाजात कुठेही तेढ निर्माण होऊ नये याची पुरेपूर काळजी ते घेताना दिसतात त्यामुळे त्यांचा चांगलाच दरारा दिसून येतो.
आता पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त राजकुमार या तिघांच्या नावात कुमार असल्याने यांचा बोलबाला सोलापुरात राहणार अशी चर्चा आता ऐकण्यास मिळू लागली आहे.