मला अपेक्षा नाही ! मी काम करणारा कार्यकर्ता ; आमदार सुभाष देशमुख झाले व्यक्त
सोलापूर : मला मंत्रीपदाची कोणतीही अपेक्षा नाही, मी काम करणारा कार्यकर्ता आहे असे सांगत देवेंद्र फडणवीस हे जे निर्णय घेतील तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
दक्षिण सोलापूर पत्रकार संघाच्या वतीने तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजय झाल्याबद्दल आमदार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, पत्रकारांची विकासामध्ये भूमिका महत्त्वाची असते, दक्षिण सोलापूर मतदार संघाच्या विकासाचे विविध मुद्दे समोर आणावेत या मतदारसंघात आणखी काय नव्याने करता येईल त्याची कल्पना द्यावी असे सांगतानाच पत्रकारांनी सुचवलेल्या विकासाच्या विषयावर त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली.
दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी दोन दिवसात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून आपले नाव मंत्रिपदासाठी येत आहे. यावर विचारले असता ते म्हणाले, मला कोणतीही अपेक्षा नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांनाच मान्य राहील असेही त्यांनी सांगितले.
2014 ते 19 च्या दरम्यान सुभाष देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री होते. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले त्यापैकी एक म्हणजे बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना त्यांनी मतदानाचा अधिकार दिला होता. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक आणला.