सोलापूरवर दंगलीचा कलंक तुम्हीच लावला ; आमदार सुभाष देशमुख यांचा काँगेसवर थेट आरोप
सोलापूर : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पद्मशाली समाजाच्या मेळाव्यात भाजपवर दंगली घडविल्याचा आरोप केला होता त्यावर देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली. केंद्रामध्ये मागील दहा वर्ष भाजपची सत्ता आहे. राज्यांमध्ये ही भाजप महायुतीचे सत्ता आहे असे असताना सोलापुरात अथवा महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही. उलट मागे पन्नास वर्षे त्यांची सत्ता होती त्या काळात अनेक दंगली झाल्या त्यामुळे सोलापूर वर दंगलीचा कलंक तुम्हीच लावला असा थेट आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी केला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या ठिकाणी साई दर्शन पर्यटन केंद्र या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. इथे त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पत्रकारांशी गप्पा मारल्या. भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात मोहीम उभा केली आहे. आपण कुठे कमी पडला का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता यावर ते म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी मागील दहा वर्षात दक्षिण सोलापूर या मतदार संघात दिला आहे. 2014 पासून मी दिलेला निधी, केलेले विकास कामे या भागाचे झालेली प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खपत नाही अशी टीका करताना पत्रकार डोळ्यांनी न पाहता कानांवर विश्वास ठेवतात अशी नाराजी भूमिका देशमुख यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात त्यांच्या हस्ते कामगारांच्या घरकुलाचे उद्घाटन झाले आणि चावी ही त्यांनीच दिली. बोरामणी विमानतळ काँग्रेस वाल्यांना करता न आल्याने आणि आमच्या काळात सोलापूर विमानतळाचे उद्घाटन झाल्याने त्यांना त्यांचे मन खाते असे सांगतानाच निंदकाचे घर असावे शेजारी या शब्दात त्यांनी विरोधकांना धारेवर धरले.