महेश कोठे सिंहासारखे लढले ! खरटमल यांनी केला कर्तृत्वाला सलाम ; बरडे यांची पक्षबांधणी यापूर्वी नव्हती का?
सोलापूर : अतिशय चुरस निर्माण झालेल्या शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात अखेर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी विजयाचा पंच मारला. त्यांना या निवडणुकीत त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे यांनी चांगलीच लढत दिली. या निवडणुकीनंतर कोठे यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. सलग चार वेळा त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी मात्र महेश कोठे यांची बाजू घेताना कोठे हे सिंहासारखे लढले, त्यांच्या कर्तुत्वाला मी सलाम करतो, खरे तर महेश कोठे यांच्यावर बायपास सर्जरी झाली असताना तसेच औषधोपचार चालू असतानाही त्यांनी या संपूर्ण मतदारसंघांत खूप मेहनत घेतली, अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. एकूण निवडणुकीचे वातावरण पाहता प्रचंड प्रतिसाद त्यांना होता. निश्चितच यावेळी बदल घडेल असे चित्र निर्माण झाले होते. विद्यमान आमदारांच्या विरोधात वातावरण होते त्यामुळे या मतदारसंघात तुतारी निश्चित वाजेल अशी चिन्हे होती पण आमच्या हाती अपयश आले.
एकूणच वातावरण आणि जनतेमधून प्रतिसाद पाहिला असता निश्चितच या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत असाही संशय ही खरटमल यांनी उपस्थित केला.
या निवडणुकीत कोठे आणि बरडे यांचा पुन्हा वाद पाहायला मिळाला या निकालानंतर कोठेंवर नाराज असलेल्या बरडे यांनी प्रतिक्रिया देताना कोठे यांना माझ्यावर केलेल्या टीकेचे उत्तर मिळाले आहे असे सांगत पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता शिवसेना पक्षाची बांधणी आणि संघटन मजबूत करण्याची भूमिका मांडली.
बरडे यांच्या या वक्तव्याचा खरटमल यांनी समाचार घेताना यापूर्वी शिवसेनेचे बांधणी, संघटन नव्हते का? असा सवाल करत महेश कोठे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती ते बरडे यांना माहिती नव्हते का? या शब्दात त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.