भाई ! इन्होने तो दिल जीत लिया ! दक्षिण मध्ये यांना नडला ओवर कॉन्फिडन्स ; काडादींची या नेत्यांनी लावली वाट
सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी हॅट्रिक करत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला. ही निवडणूक वन साईट झाली. सुभाष देशमुख हे तब्बल 77 हजाराने विजय होतील हे कुणालाही वाटले नाही परंतु दक्षिण मधील एकूणच वातावरण पाहता त्यांचा रनवे वनवे झाला.
या निवडणुकीत अनेक युवा नेत्यांनी सर्वांच्या लक्ष वेधले. सुभाष देशमुख यांना तगडी फाईट देत अनेकांनी मने जिंकली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे अमर पाटील, वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार, दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड, अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांचा समावेश म्हणावा लागेल.
अमर पाटील युवा असतानाही त्यांनी या मतदारसंघात आपली छाप सोडली आहे. जे काडादी यांना जमले नाही ते त्यांनी करून दाखवले. वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार व दक्षिण परिवर्तनचे युवराज राठोड यांचा प्रचार जोरदार होता. पवार – राठोड यांच्या सभा, झालेल्या रॅली व पदयात्रेला प्रचंड गर्दी होती. त्यांच्या भाषणाच्या मुद्द्यांमध्ये दक्षिणचा विकास हा एकमेव होता. विकासाचे मुद्दे या नेत्यांनी आक्रमकपणे मांडले.
वैद्य यांनी एकाकी झुंज दिली. दक्षिणच्या विकासाची ब्लू प्रिंट त्यांनी तयार केली होती अनेक समाजाचा त्यांना पाठिंबा मिळाला होता. पण त्यांच्या पदरी अपयश आले. आता त्यांनी जाहीर करून टाकले आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत इलेक्शन लढवणार नाही. गड्या आपली मुंबईच बरी असे म्हणून ते मंत्रालयात पुन्हा जॉईन झाले आहेत.
या मतदारसंघात काँग्रेस मधून मनसेचे इंजिन हाती घेतलेले महादेव कोगणुरे यांना मात्र अति ओवर कॉन्फिडन्स नडल्याचे पाहायला मिळते. काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी कडून दक्षिण सोलापूर विधानसभा लढवायची असे ध्येय घेऊन कोगणुरे यांनी मागील काही वर्षात वाटचाल केली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर दक्षिणची तयारी केली. पण काँग्रेसच्या नेत्यांकडून होत असलेली जाणीवपूर्वक डावलनूक पाहता त्यांनी थेट मनसेमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी आणली.
निकालानंतर केवळ त्यांना 2100 मते मिळाली. मुळात दक्षिण मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेच नाहीत त्यामुळे कोगणुरे यांना एकाकी लढत द्यावी लागली. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली असली तरी यापेक्षा जास्त मते घेतली असती अशी चर्चा आता होत आहे.
काँग्रेसकडून दिलीप माने आणि सुरेश हसापुरे नको म्हणून बळजबरीने धर्मराज काडादी यांना तयार केले. त्यामध्ये राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, गुरुसिद्ध म्हेत्रे, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, एडवोकेट संजय गायकवाड, जाफरताज पाटील यांचा समावेश होता त्यानंतर सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांनी सांगितल्यानंतर हसापुरे या सर्वांना जॉईन झाले. पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या काडादी यांची घोर निराशा झाली. समाजाच्या नावावर दक्षिण मध्ये जे नेते उड्या मारतात त्यांचे मजल कुठपर्यंत आहे हे मतदारांनी एकदाचे दाखवून दिले.
काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांनी बंडखोरी केली असली तरी त्यांनी स्वतःला साजेल असे मतदान घेतले. काडादी सोबत काँग्रेसची संपूर्ण फौज होती, तरीही बाबा मिस्त्री यांनी त्यांच्यापेक्षा किमान दहा हजार मते जास्त घेतली. त्यामुळे या निवडणुकीत बाबा मिस्त्री यांनी सुद्धा स्वतःची छाप सोडली आहे.