‘सोलापूरच्या लेकीं’नी गाजवले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्टेज ; उध्दव ठाकरेंच्या सभेत ही घुमला यांचाच आवाज ; किस्से लोकसभा निवडणुकीचे
सोलापूर : 2024 ची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी लक्षात राहणारी असेल. राजकीय, सामाजिक दृष्ट्या अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. राजकीय नेते, कार्यकर्ते, यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष वेधले. सोशल मीडिया सुद्धा महत्वाचा घटक ठरला.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत सोलापूरची लेक हा शब्द चर्चेचा विषय ठरला. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व माळशिरसचे आमदार राम सातपुते हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. त्यामध्ये राम सातपुते बीडचे असल्याने प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूरची लेक असा उल्लेख करत प्रचार केला गेला.
याच लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या दोन लेकींनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर सूत्रसंचालन करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. सोलापूरच्या या दोन लेकी म्हणजेच आपल्या सूत्रसंचालन आणि निवेदनात महाराष्ट्रात आपले नाव कमावलेली श्वेता हुल्ले आणि मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेली, अनेक पक्षांच्या तसेच सामाजिक कार्यक्रमाच्या स्टेजवर निवेदनातून सर्वांचे लक्ष वेधणारी ऐश्वर्या हिबारे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना स्पेशली हिंदीवर प्रभुत्व असणाऱ्या आणि मुंबई किंवा पुण्यातील निवेदिकांना आमंत्रित केले जाते. परंतु यंदा या सोलापूरच्या दोन्ही लेकींनी बाजी मारली आहे.
श्वेता हुल्ले यांनी कोल्हापूर आणि माढा मतदारसंघात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत सूत्रसंचालन करत स्वतः मोदींचे लक्ष वेधले तर ऐश्वर्या हिबारे हिने धाराशिव मतदार संघात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेत निवेदनातून आपला ठसा उमटवला. हुल्ले यांच्या सोबत तर मोदींनी स्वतः फोटो काढले.
या दोघींचे एक वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच या निवडणुकीतील त्यांचे कट्टर विरोधक शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोलापुरातील सभेचे निवेदन ऐश्वर्या हिबारे तर धाराशिव मध्ये झालेल्या ठाकरे यांच्या सभेचे निवेदन श्वेता हुल्ले यांनी केले. हे या दोघींच्या आयुष्यातील आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.