दक्षिण मध्ये अमर पाटलांची ताकद वाढली ! माजी आमदार शिवशरण पाटील शिवसेनेत
सोलापूर : यंदाची दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक ही लिंगायत समाजासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या समाजातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे, राष्ट्रवादीचे बंडखोर बसवराज बगले हे नेते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला उभे आहेत.
काँग्रेस पक्ष उघड उघड काडादी यांच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर दिलीप माने हे सुद्धा काडादी यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. आता अमर पाटील यांनाही वाढता पाठिंबा मिळत असून काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान त्यांचे काका माजी आमदार रविकांत पाटील यांनी स्टेजवर उपस्थिती लावून सर्वांना धक्का दिला.
आता सोलापूरचे माजी आमदार लिंगायत नेते शिवशरण पाटील यांनी पुन्हा स्वगृही परत येताना शिवसेनेत प्रवेश करत अमर पाटील यांना पाठिंबा दिला आहे. शिवशरण पाटील यांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पार्टीला धक्का मानला जात आहे.