सोलापुरात महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांसाठी संग्राम मोर्चा ; खासदार प्रणिती शिंदे करणार नेतृत्व
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही, भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी सरकार विरोधात मंगळवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी भव्य असा संग्राम मोर्चा काढण्यात येणार आहे.
मंगळवारी चार हुतात्मा पुतळा या ठिकाणापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये होणार असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापुर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटकुटीला आला. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मागील नुकसान भरपाई अद्याप ही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटाकुटीला आला आहे.
या आहेत मागण्या
1) शेती मालाला हमीभाव मिळत नाही.
2) सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?
3) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले परंतु नुकसानीची भरपाई मिळाली नाही याचा जाहीर निषेध.
4) शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीत केलेल्या 10 पट वाढीचा निषेध.
5) शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा दया.
6) शेती अवजारे, खत व औषधे यावरील GST रदद् करा.
7) 7.5 HP विज बिल माफ केले. 8/9 HP पुढील विज बील माफ कधी होणार?
8) PM किसानची रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही.
9) शेतीसाठी कॅनल मधून पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही.
10) सोयाबीन, तूर, कांदा, उडीद व फलबाग यांचा पिक विमा विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मिळत नाही.