सोलापुरात सोने चोरणारी महीला दोन वर्षासाठी तडीपार
महिला नामे, संगीता शेखर जाधव, वय-४५ वर्षे, रा. घर नं.५८, चर्च जवळ, धोंडीबा वस्ती, रामवाडी, सोलापूर याचेविरुध्द सन २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये बुरखा घालून सोने-चांदी विक्रीच्या दुकानात जावून त्याठिकाणी दुकानातील कामगारांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांची नजर चुकवून सोन्या-चांदीचे दागिन्यांची चोरी करणे, चोरी करताना त्यांना कोणी पकडल्यास त्यांचेविरुध्द विनयभंगाची तक्रार देणे, सोबत आणलेले पुरुषांकडून प्रसंगी मारहाण करणेस लावणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने तिचेविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.३२१२/२०२५ दि.१८/१२/२०२४ अन्वये, महिला नामे, संगीता शेखर जाधव, वय-४५ वर्षे, रा. घर नं.५८, चर्च जवळ, धोंडीबा वस्ती, रामवाडी, सोलापूर हिस सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. सदर महिलेस तडीपार केल्यानंतर ठाणे येथे सोडण्यात आलेले आहे.