सोलापुरात एकनाथ भाईंची शिवसेना एकवटली ! सोलापुरातील पाच जागांवर दावा ; दोन इच्छुकांमध्ये सीएम ‘सुवर्ण मध्य’ काढणार का?
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मागील काही महिन्यांपासून गटातटात विभागलेली शिवसेना एकवटली आहे. सोलापूरच्या शिवसेनेने आता जिल्ह्यातील पाच जागांवर दावा केल्याने महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान शहर मध्य या मतदारसंघात असलेल्या दोन इच्छुक नेत्यांमध्ये आता एकनाथ भाई सुवर्ण मध्य काढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सोलापुरात येत आहेत. मुख्यमंत्र्याच्या स्वागताची सर्वच नेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यामध्ये जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयाकडून सीएम साहेबांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या सोलापूर दौऱ्यावर येऊन गेल्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या सर्वच नेत्यांची उपस्थिती होती. शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करून सर्व नेत्यांना निमंत्रण दिले होते. त्यामध्ये जिल्ह्याचे संपर्क नेते संजय माशीलकर, जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, उमेश गायकवाड, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्यासह सर्वच नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत गटातटात विभागलेले नेते एकामेकांमधील नाराजी विसरून एकवटल्याचे पाहायला मिळाले. विशेष करून अमोल शिंदे आणि मनीष काळजे एकमेकांच्या शेजारी बसल्याने बऱ्याच कार्यकर्त्यांना आनंद झाला. शिवसेना नेत्यांना एकवटण्यात शहर प्रमुख शेजवाळ यांचा वाटा असल्याचे दिसून आले.
अमोल शिंदे यांनी आपण कोणत्याही मतदारसंघातून इच्छुक नाही परंतु जी जागा आपणाला मिळेल तिथे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली.
या बैठकीत शहर मध्य सह दक्षिण सोलापूर, मोहोळ करमाळा सांगोला अशा पाच जागांवर शिवसेना नेत्यांनी दावा केला आहे.
शहर मध्य या मतदारसंघात आता राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे दोन्ही इच्छुक आहेत. पक्षाने ज्योती वाघमारे यांच्यावर राज्याची जबाबदारी दिली आहे. त्या राज्याच्या प्रवक्त्या असल्याने या निवडणुकीत त्यांना प्रचाराला राज्यात फिरावे लागणार याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राहतात मनीष काळजे.
आता या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शहर मध्य मध्ये इच्छुक दोघात एकनाथ भाई ‘सुवर्ण मध्य’ काढणार का असे चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. उमेदवारीसाठी मनीष काळजी यांचे मात्र पारडे जड जड असल्याचे बोलले जाते.